एक वाटसरू जो निघालाय
दुरून साजरे दिसनारे डोंगर जवळून पहायला,
त्याने धरलीय एक पायवाट
जी पूर्णपणे मळलेली आहे, कदाचित कित्येक पिढ्या ह्या वाटेने चालल्या असाव्यात, तरीही ती अदृश्यच ,
तो चालतोय, चालतोय आणि फक्त चालतोय ,
तासामागून तास जातोय पण तो चालतोय ,
तो चालतोय दरी-खोऱ्यांतून, नदी नाल्यांतून,
ओलांडतोय कित्येक टेकड्या,
तो अनुभवतोय निसर्ग स्वच्छंदपणे
तो चालता चालता पोहोचला एका वस्तीत,
कदाचित पाडा असावा,
जो तिथल्याच गावांपासून, तालुक्यांपासून, जिल्ह्यांपासून,
खरतर ह्या देशापासून अलिप्त आहे म्हणा,
जिथे माणस अर्धनग्न फिरतायेत,
जिथं घर कारव्याचीच आहेत आजही,
जिथं एकीकडे नजर जाईल तिथपर्यंत धरणाच पाणी दिसतंय,
पण माणूस पाण्याच्या, थेंबासाठी झटताना दिसतोय,
चिल्लीपिल्ली कुपोषणाने हेरलेली दिसतायत,
शाळा नाही, अंगणवाडी पण नाही,
पायाभूत सुविधांचा तर नामोनिशानच नाही,
काहीच म्हणजे काहीच नाही,
फक्त आहेत ति या निसर्गावर अवलंबून राहणारी,
आपल्याच आयुष्याशी संघर्ष करणारी माणसे,
खरतर या पाड्याची पायवाट अदृश्यच ,
हा पाडाही अदृश्यच,
आणि इथली माणसेही अदृश्यच,
अस्तित्व नसलेली,
ह्या जगासाठी.
एका बाबान विचारलच त्या वाटसरूला
तू बाबा कुठुन आलास?
कारण इथ फक्त वाट चुकलेली माणसे येतात!
नामदेव येडगे