नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुन्हा सहा महिन्यांसाठी लांबणीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन वर्षांत पाच वेळा निवडणूक लांबणीवर गेल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार चांगलेच आर्थिक अडचणीत आले आहेत. काहींनी तर जनसंपर्क कार्यालयही बंद केले आहे, तर काहींनी प्रभागात करण्यात येणाऱ्या कामाला ब्रेक लावल्याचे दिसून येत आहे.
ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत, या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. याला नवी मुंबई महापालिकाही अपवाद नाही. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा नवी मुंबई महापालिकेची स्थिती वेगळी आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक ही अद्यापपर्यंत अधिकृत दोन व अनधिकृत तीन अशा पाच वेळा पुढे ढकलली गेली आहे.