राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विविध एसटी स्थानकातली वाहतूक ठप्प आहे. बहुतांश ठिकाणी कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी एसटी ठप्प आहे. सर्वसामान्य जनतेचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईत संपाला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. तर पुण्यात ग्रामीण भागातल्या डेपोत संप सुरू आहे. पुणे शहर भागातले तसंच बारामती डेपो बंद होत आहे.
एस टी कर्मचा-यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. संपाबाबत हायकोर्टात सुरू असलेली सुनावणी सोमवारी सकाळी १० पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. शनिवारच्या सुनावणीत कामगारांच्या आत्महत्यांवरून न्यायमुर्ती एस जे काथावाला यांनी राज्य सरकारला सुनावलं. एस टी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. आधी कमिटीचा जीआर काढण्याची मागणी संघटनांनी लावून धरलीय. लवकर तोडगा निघाला नाही, तर १०० टक्के कामगार संपावर जातील, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.