कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लोक स्वच्छतेबाबतीत अतिशय जागृत झाले आहेत. यात आरोग्य असेल किंवा घरातील स्वच्छता यात कोणतीही कसर सोडत नाहीत. तसेच कोरोनाव्हायरसच्या काळात हँड सॅनिटायझरमुळे बचावासाठी दिलासा मिळाला आहे व लोक साबणाने हात धुण्यापेक्षा हँड सॅनिटायझरचाच जास्त वापर करताना दिसत आहे. परंतु तुम्ही तसे करत असाल तर सावधान!! केंद्र सरकारने नुकतेच त्याच्या अधिक वापराने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत नागरिकांना सावध केलं आहे.
कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोकांना साबणाने हात धुण्याचा किंवा सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे. मात्र हँड सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचेचे नुकसान होवू शकतं, असं याआधी तज्ज्ञांनी सांगितलं होते, हँड सॅनिटायझरचा अति वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. शिवाय लोकांनी सॅनिटायझर ऐवजी साबणाचा वापर केला तर योग्य राहील, असा सल्लाही दिला आहे.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आर. के वर्मा म्हणाले, एखाद्या व्हायरसचा इतका प्रकोप होईल याचा कधी कुणी विचारही केला नव्हता. तसेच लोकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा. गरम पाणी प्या आणि हात नीट धुवा, सॅनिटायझरचा जास्त वापर करू नका.
तज्ज्ञांच्या मते, सॅनिटाझरच्या अतिवापर केल्याने त्वचेवरील चांगल्या बॅक्टेरियांचाही नाश होऊ शकतो. पाणी आणि साबण यांचा वापर करून हात साफ करा. साबण नसेल तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करा, किंवा सर्दी, खोकला इन्फेक्शन असल्यास त्याचा कमी अधिक वापर केला तर चालू शकेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
त्यामुळे तुम्हीदेखील कोरोनाच्या भीतीनं हँड सॅनिटायझर वापरत असाल, तर त्याचा वापर मर्यादित करा.